

भक्तीचा जल्लोष अन् निरोपाचा क्षण

वेंगुर्ले : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वेंगुर्ले तालुक्यातील पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे शुक्रवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात घराघरांत विराजमान झालेल्या गणेशमूर्तींचे समुद्रकिनारे, नदी, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गेले पाच दिवस घरोघरी मनोभावे पूजन करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांसह लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी एकत्र येत सामूहिक आरती केली. आरतीनंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनाऱ्यांवर तसेच नदी-ओहोळांच्या ठिकाणीही गणेशभक्तांची गर्दी दिसून आली.
पाच दिवस बाप्पाच्या सेवेत रमलेल्या भक्तांसाठी विसर्जनाचा क्षण भावूक करणारा ठरला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिकतेचा सुरेख संगम साधत वेंगुर्ले तालुक्यातील पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.









