

महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांचा संताप
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीएसएनएल विभागाच्या कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त करीत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने चांगली सेवा देण्याची मागणी करण्यात आली.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा गुरूवारी सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी प्रविण हिर्लेकर, पं.स.सदस्य यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात महावितरण प्रशासनाने ग्राहकांना चांगली व सुरळीत वीज सेवा द्यावी, तसेच वीज बिल वसुलीचा ग्राहकांवर तगादा लावू नये, गणेशोत्सवानंतर वसुली मोहीम राबवावी, अशी मागणी सदस्य योगेश धुरी व अमित भोगले यांनी केली. त्यावर सभापती नाईक यांनी महावितरणला आवश्यक ते निर्देश दिले. योगेश धुरी यांनी माणगावचे महावितरण शाखा अभियंता नागरिकांचे फोन उलचत नसल्याची तक्रार सभागृहात करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. एखादी समस्या निर्माण झाल्यास, नागरिक फोन करतात, अशावेळी शाखा अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगताच त्यांना फोन रिसीव्ह करण्याच्या सूचना देण्याची मागणी महावितरणच्या अधिका-यांकडे केली. याची दखल सभापती नाईक यांनी घेत, सभागृहातूनच त्या शाखा अभियंत्यांना फोन करण्याची सूचना केली, मात्र महावितरणच्या उपस्थित अधिका-यांनी त्यांचा फोन एंगेज येत असल्याचे सांगून त्यांना फोन उचलण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे स्पष्ट करीत पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. सभापती नाईक यांनी लोकांचे जर ते फोन उचलत नसतील तर असं चालणार नाही, त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा मला तिथे जावे लागेल असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला. याच चर्चेदरम्यान सभापती नाईक यांनी सदस्य धुरींना उद्देशून, माणगावचे शाखा अभियंता आम्हीच पाठपुरावा करून आणल्याचे सांगताच, धुरींनीही आम्हीही पाठपुरावा केला होता, असे प्रत्युत्तर दिले. दोघांत जोरदार चर्चा सुरू असतानाच सदस्य बाळकृष्ण मडव यांनी उठून दोघांच्याही अभिनंदनाचा ठराव घ्यावा, अशी मिश्किल सूचना मांडली. नितीन म्हाडेश्वर यांनी आंब्रड साठी नवीन वायरमन देण्याची मागणी केली. ममता राऊळ यांनी पिंगुळीत महावितरण कडून काही भागात ट्रि कटिंग केली नसल्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याचे सांगून, तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. सभापती व उपसभापती यांनी तातडीने अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, सदरची समस्या दूर करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या.
अमित भोगले यांनी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी महा ऍग्रो कंपनीचे ‘रत्नागिरी-८’ या जातीचे भात बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. मात्र प्रत्यक्षात हे भात पीक अपेक्षित कालावधीपूर्वीच, अवघ्या दोन महिन्यांत परिपक्व होण्यास सुरुवात झाल्याचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, कृषी विभागाने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. योगेश धुरी यांनीही, पिकलेल्या भातामुळे वन्य प्राण्यांकडून त्या परिसरात शेतीची नासधूस केली जात असून, या सर्वांचे पंचनामे केले जावेत अशी मागणी केली. त्यावर तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांनी महा ऍग्रो कंपनीमार्फत देण्यात आलेल्या ‘रत्नागिरी-८’ या वाणात अन्य वाण मिक्स झाल्याची शक्यता असून, मिक्स झालेले वाण परिपक्व होत आहे. याबाबत कार्यवाही सुरू आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा कृषी विभागाचा भर राहील असे आश्वासित केले.
अर्चना बंगे यांनी वालावल-हुमरमळा भागात सा.बां.विभागाने रस्ता दुतर्फा साईडपट्टी चांगली साफ केलीय परंतू, वरची धोकादायक झाडी जैसे थे असल्याचे सांगून याचा वाहनधारकांसाठी धोका निर्माण होत असल्याचे सांगून ती झाडी हटवण्याची मागणी केली. योगेश धुरी यांनी माणगाव मधील खड्डे बुजवणे व गटार सफाईचे काम अर्धवट असल्याचे सांगून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. संतोष कांदळकर यांनी कसाल बसस्थानकातील समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. सदस्य निखिल कांदळगावकर व बाळकृष्ण मडव यांनीही पणदूर घोडगे रस्त्यावरील खड्ड्यांबाबत लक्ष वेधले.









