

ढोल-ताशांचा गजर, बाप्पाचा जयघोष; मालवणमध्ये अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

मालवण : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मालवण तालुक्यात आज गुरुवारी अकरा दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारे, नदी, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तींच्या मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी महिला व युवकांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अकरा दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनामुळे तालुक्यातील समुद्रकिनारे व विसर्जनस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत पाणी तरळले, तर पुढील वर्षी बाप्पा लवकर यावा, अशी प्रार्थना करण्यात आली.









