

सिंधुदुर्गात प्रथमच पावशीत ‘अल्बिनो कॉमन क्रेट’ची नोंद
सर्पमित्र अनिल गावडे, डॉ. योगेश कोळी, वनविभाग यांचे निरीक्षण
कुडाळ : सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सर्पाची भर पडली आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी येथे जिल्ह्यात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो मण्यारची नोंद झाली आहे. नेहमी काळसर किंवा निळसर-काळ्या रंगात आढळणारा मण्यार चक्क पांढऱ्या रंगात दिसून आल्याने ही नोंद सर्पअभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी या दुर्मिळ मण्यारची नोंद केली. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील आणि वनपाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. सापाची शारीरिक वैशिष्ट्ये, रंग आणि डोळ्यांचा रंग यांचे निरीक्षण करून ही नोंद करण्यात आली.
काळ्या मण्याराचे अनोखे पांढरे रूप
मण्याराचे शास्त्रीय नाव बुंगारस कॅर्युलियस असून तो विषारी सापांच्या इलॅपिडी कुळातील आहे. सामान्य मण्यार काळसर किंवा निळसर-काळ्या रंगाचा असून शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात. गुळगुळीत शरीर, पाठीवरील मध्यवर्ती रांगेतील मोठे षटकोनी खवले, लहान डोके आणि तुलनेने लहान डोळे ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मात्र, पावशी येथे आढळलेल्या मण्यारचा रंग पूर्णपणे वेगळा दिसून आला. शरीरातील रंगद्रव्याची निर्मिती कमी किंवा अनुपस्थित असल्यामुळे त्याचा नेहमीचा काळा रंग दिसत नाही. पूर्ण अल्बिनो अवस्थेत डोळे लालसर दिसण्याची शक्यता असते.
रात्री भक्ष्याच्या शोधात
मण्यार हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो. दिवसा तो दगड, लाकडाचे ढिगारे, बिळे किंवा घराभोवतीच्या अंधाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी लपून राहतो. रात्री अन्नाच्या शोधात तो बाहेर पडतो. विषारी साप असल्याने तो आढळल्यास नागरिकांनी त्याला हाताळण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहा हजारांहून अधिक वन्यजीवांचे रेस्क्यू
सर्पमित्र अनिल गावडे गेल्या अनेक वर्षांपासून सापांसह विविध वन्यजीवांच्या रेस्क्यूचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा हजारांहून अधिक वन्यजीवांचे रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोल्हापूर रेस्क्यू टीमसोबतही त्यांनी काम केले आहे. सापांविषयी नागरिकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करून सर्पसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे कामही ते करीत आहेत. साप दिसला की त्याला मारण्याऐवजी सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवाहन केले.
प्राणी अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी सांगितले की, सापांमध्ये रंगवैविध्य नैसर्गिकरीत्या आढळते. अल्बिनिझम ही आनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. यात शरीराचा रंग तसेच डोळ्यांतील रंगद्रव्य कमी किंवा अनुपस्थित असू शकते.
अल्बिनो आणि ल्युसिस्टिक सापांमध्ये फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ल्युसिझममध्ये शरीराचा रंग फिका किंवा पांढरा असला तरी डोळ्यांमध्ये रंगद्रव्य टिकून राहू शकते; तर अल्बिनिझममध्ये डोळ्यांतील रंगद्रव्याचाही अभाव दिसतो. त्यामुळे अशा सापाची नोंद करताना डोळ्यांचा रंग, शरीररचना आणि इतर ओळख वैशिष्ट्यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी माहिती
पावशी येथे झालेली अल्बिनो मण्यारची नोंद ही केवळ दुर्मिळ साप आढळल्याची घटना नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्पवैविध्य आणि रंगवैविध्याच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण निरीक्षण आहे. अशा दुर्मिळ नोंदींमुळे जिल्ह्यातील जैवविविधतेची व्याप्ती आणि वैशिष्ट्ये समोर येण्यास मदत होते. सिंधुदुर्गच्या निसर्गसंपदेतून समोर आलेल्या या अनोख्या मण्यारामुळे सर्पविश्वातील रंगवैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.









