ठळक घडामोडी

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पटांगणात रंगणार ७९ वी मानाची डबलबारी!

सुरज खांडेकर विरुद्ध सुशांत जोईल; ३ ऑक्टोबरला रंगणार भजनाचा सामना

पारंपारिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी; श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
      गणेशोत्सवानिमित्त कुडाळ पोलीस ठाण्या समोरील पटांगणात शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारंपरिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली, मानाची व नावलौकिक प्राप्त डबलबारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पारंपरिक डबलबारीचे यंदाचे ७९ वे वर्ष आहे. त्यामुळे या भजन सामन्याकडे जिल्ह्यातील भजनरसिकांचे लक्ष लागले आहे.
      कुडाळ पोलीस ठाण्यात दरवर्षी २१ दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यंदाही पोलीस ठाण्यासमोरील मैदानात गणेशोत्सवाच्या २० व्या दिवशी, ३ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सायंकाळी ४ वाजता पारंपरिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
     यंदाच्या सामन्यात बुवा कु. सुरज खांडेकर (श्री आई जांभई देवी प्रासादिक भजन मंडळ, पोंभुर्ले-देवगड) आणि बुवा कु. सुशांत जोईल (श्री देव महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कातवण-देवगड) यांच्यात जुगलबंदी रंगणार आहे.
बुवा सुरज खांडेकर यांना पखवाजाची साथ मंजिल काळसेकर, तर तबल्याची साथ शुभम खांडेकर देणार आहेत. बुवा सुशांत जोईल यांना पखवाजाची साथ तुषार शिंदे, तर तबल्याची साथ ओंकार लब्दे करणार आहेत.
        या मानाच्या डबलबारीचा आस्वाद घेण्यासाठी कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनरसिक व डबलबारीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. सर्व भाविक-भक्त तसेच भजनप्रेमींनी उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार वृंद यांनी केले आहे.

error: Content is protected !!