

सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच दिवसांच्या गणरायाला शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत घरगुती गणेशमूर्तींचे समुद्र, नदी, तलाव, ओहोळ तसेच विविध विसर्जनस्थळी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत घराघरांत गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा, आरती, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पाचव्या दिवशी दुपारनंतर गणेशमूर्ती विसर्जनाची लगबग सुरू झाली होती. सायंकाळी विसर्जन मिरवणुकांना वेग आला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शहरांसह ग्रामीण भागातील विविध विसर्जनस्थळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. महिलांसह लहान मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिकही या मिरवणुकांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला.









