

कुडाळ : प्रतिनिधी
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी करून अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.
मंत्री दादा भुसे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सकाळी ८ वाजता कुडाळ पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते जि.प. प्राथमिक शाळेला भेट देतील. त्यानंतर ८.३० वाजता कुडाळ हायस्कूल, ९ वाजता बॅ. नाथ पै हायस्कूल, कुडाळ, १० वाजता एस. एल. देसाई विद्यालय, पाट आणि ११.३० वाजता जि.प. शाळा, पावशी नं. १ येथे भेट देणार आहेत. यानंतर दुपारी १ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुनीती जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.









