

चाकरमान्यांसह शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातबारावर तात्काळ नोंद करण्याची मागणी
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या नागरिकांची जमीनविषयक कामे रखडू नयेत, यासाठी गणेश चतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील सर्व गावांमधील ई-पीक पाहणी पूर्ण करून त्याची सातबारावर तात्काळ नोंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच, पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ही प्रक्रिया सर्व गावात पूर्ण करावी, अथवा पूर्वीप्रमाणे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनाच ई-पीक पाहणी करण्याचे अधिकार देण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पीक पाहणी करण्यासाठी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांची नेमणूक केली आहे. परंतु एक किंवा दोन व्यक्तींकडे संपूर्ण गावातील सर्व्हे नंबरची ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने जलद गतीने हि प्रक्रिया होत नाही. त्याचबरोबर पीक पाहणी सहाय्यक यांनी केलेल्या ई-पीक पाहणीला मंजुरी मिळत नसल्याने सातबारावर पीक पाहणीची नोंद होत नाही.
त्यामुळे नवीन पिक कर्ज, शासकीय नुकसान भरपाई, उत्पन्न दाखले, जमीन खरेदी, विक्री प्रकरणे अशी जमिनीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कायदेशीर,आर्थिक आणि शासकीय कामे प्रलंबित आहेत.त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईतून सिंधुदुर्गात येणाऱ्या नागरिकांना वरील कामे करता येणार नसल्याने त्यांची गैरसोय होणार असून याचा नाहक त्रास त्यांना होणार आहे.
तरी हि गैरसोय टाळण्यासाठी गणेश चतुर्थी आधी ‘पीक पाहणी सहाय्यक’ यांच्यामार्फत सर्व गावातील ई-पीक पाहणी पूर्ण करून त्याची सातबारावर तात्काळ नोंद करण्यात यावी. अथवा मोबाईल एप्लिकेशन द्वारे ई-पीक पाहणी करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.









