ठळक घडामोडी

मतदार यादी SIR प्रक्रियेला मुदतवाढ; दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी!

१६ नोव्हेंबरला महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी; SIR पुनरीक्षणाला आयोगाची मुदतवाढ

‘Unmapped’ मतदारांच्या घरीच कागदपत्रे संकलित होणार; SIR प्रक्रियेला नवी मुदत

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे किंवा हरकती दाखल करता येणार आहेत.
       विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे ज्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशा मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेण्यात येईल. अशा सुनावणीस मतदाराच्या वतीने कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य उपस्थित राहू शकणार आहे.
      मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये राहणारे नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर गरजेनुसार विशेष मदत कक्ष आणि विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. पात्र नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीतील आपली नोंद अचूक असल्याची खात्री करावी आणि आवश्यक असल्यास १२ ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची संधी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!