

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कुडाळ दुमदुमले
सोमवारी विधिवत पूजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात स्थानापन्न होणाऱ्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आज शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात जल्लोषात आगमन झाले. बजाज शोरूम ते उत्सवस्थळ अशी मिरवणूक काढण्यात आली. सोमवार, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सकाळी श्रींचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे.
खासदार नारायण राणे, सौ.निलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कुडाळात हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या आगमन मिरवणुकीत सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.









