

ग्रामपंचायत अणाव, संविता आश्रम व रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारा उभारणीला सुरुवात
कुडाळ : अपुऱ्या पावसामुळे यंदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच पाणी संवर्धनाची गरज आहे. याच उद्देशाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची जनजागृती करत ग्रामपंचायत अणाव, संविता आश्रम आणि रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बंधारा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमातून पाणी अडवून त्याचा जास्तीत जास्त साठा व जमिनीत पाणी जिरविणे, तसेच उपलब्ध पाण्याचा भविष्यात जपून वापर करण्याचा संदेश ग्रामस्थांना देण्यात आला. जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत बंधारा उपक्रमाची सुरुवात अणाव येथे होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून परिसरातील भूजलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
बंधारा उभारणीच्या शुभारंभप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, पंचायत समिती उपसभापती श्री. मिलिंद नाईक, अणाव सरपंच श्री. लिलाधर अणावकर, रोटरी क्लब कुडाळचे श्री. मकरंद नाईक, संविता आश्रमचे श्री. संदीप परब, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. हिर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्रामपंचायत अणावच्या उपसरपंच सौ. आदिती अणावकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. मृणाल परब व सौ. सुवर्णा परब, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रदीप नारकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, आज अडवलेले पाणी उद्याच्या पिढीसाठी जीवनदायी ठरणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावाने आणि प्रत्येक कुटुंबाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच पाणी अडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
बंधारा उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी गावाला निश्चितच मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत अणाव, संविता आश्रम आणि रोटरी क्लब कुडाळ यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.
‘आज पाणी अडवूया… उद्याचे संकट टाळूया!’ या संदेशाने अणाव येथे पाणी संवर्धनाच्या या आदर्शवत उपक्रमाची सुरुवात झाली.









