

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ
कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे नागरिकांना मार्गदर्शन
कुडाळ : उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय, कुडाळ यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भटक्या/ विमुक्त जाती-जमातींसाठी आयोजित विशेष शिबिर आज तहसीलदार श्री. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत अन्नपूर्णा हॉल, गोठोस तिठा, ता. कुडाळ येथे उत्साहात संपन्न झाले.
भटक्या जाती-जमातीतील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, तसेच आवश्यक दाखले व कागदपत्रांसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी व्हावी, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये महसूल विषयक लाभ, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, जातीचे दाखले, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका तसेच ७/१२ विषयक कामे यांसह विविध शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी नागरिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. तहसीलदार श्री. सचिन पाटील यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणींचे निराकरण केले. सदर कार्यक्रमास गोठोस, माणगाव महसूल मंडळातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मंडळ अधिकारी गोठोस, माणगाव तसेच ग्राम महसूल अधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आपल्या हक्कांसाठी – शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भटक्या जाती-जमातीतील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ व गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत झाली.









