

पावसाची तूट, वाढत्या उन्हामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होण्याची भीती
पाणी साठवणुकीकडे आताच लक्ष देण्याची गरज
कुडाळ : यंदा पावसाची तूट आणि त्यानंतरच्या तीव्र उन्हामुळे सिंधुदुर्गातील भातशेती करपू लागली असतानाच आता नदी, ओहोळांच्या पाणीपातळीतही मोठी घट होऊ लागली आहे. तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. कुडाळ शहराला लागून असलेल्या भंगसाळ नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, सध्या नदीचा तळ दिसू लागला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट आतापासूनच गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील अनेक भागांत पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्याने शासनाकडून दुष्काळ व्यवस्थापनाच्या निकषांनुसार ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील सर्व आठ तालुक्यांमध्येही पावसाची तूट आणि खरीप पिकांवरील परिणामाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नदीपात्रांतील पाणी कमी होत असल्याने आगामी काळातील जलसंकटाची तीव्रता लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
साधारणपणे सप्टेंबर महिन्यात पावसाळा अंतिम टप्प्यात असतो. मात्र, यंदा सप्टेंबर संपून ऑक्टोबर सुरू होतानाच भंगसाळ नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. काही ठिकाणी नदीपात्रातील गोटे, वाळू आणि नदीचा तळ स्पष्टपणे दिसत आहे. पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा न झाल्यास मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती किती गंभीर होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुडाळ भंगसाळ नदीसह तालुक्यातील अन्य नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहांवर मोठे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तलावही पूर्णपणे भरलेले नाहीत. परिणामी उन्हाळ्यात विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी उन्हाळ्यात पिण्याचे पाणी, शेती तसेच पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. नदी-नाल्यांवरील बंधारे, पाणी अडविण्याच्या संरचना आणि उपलब्ध जलस्रोतांमध्ये पाणी साठवणूक वाढविण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी वाहून समुद्रात जाण्यापेक्षा ते स्थानिक पातळीवर अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठी व्यापक जलसंधारणाची कामे करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः नदीपात्रांतील बंधारे, नालाबांध, गाळ काढणे आणि पाणी अडविणाऱ्या संरचनांची डागडुजी याकडे प्रशासनाने आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे.
यंदाच्या पावसाच्या तुटीचा परिणाम केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यातही जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे जलसंधारणावर भर देणे आवश्यक आहे. सप्टेंबरअखेरीसच नदीपात्राची अशी अवस्था झाली असेल, तर पुढील सात-आठ महिन्यांचा कालावधी लक्षात घेऊन पाणी साठवणुकीचे नियोजन आताच करणे काळाची गरज बनली आहे.
कुडाळ तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पुराची समस्या निर्माण होते. मात्र यंदा एकदाही पूर आलेला नाही. समाधानकारक पाऊसच पडला नसल्याने जमिनीत पूर्णपणे पाणी मूरलेच नाही, त्यातच सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने, त्याचा भूजलपातळीवर मोठा परिणाम होत असून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची भिती जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.









