ठळक घडामोडी

कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक; जेसीबीने रस्ता केला बंद!

कचरा डेपो हटविण्याची मागणी; नागरिकांचा मोठा एल्गार

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ नगरपंचायतीचा सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेतली. श्री देव वरडेश्वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत हा कचरा डेपो तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर चर खोदून मार्ग बंद केला. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
       या डेपोमुळे दुर्गंधी, कचरा विखुरणे तसेच भटके कुत्रे व पक्ष्यांचा वाढता वावर यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे यावेळी नागरीकांनी स्पष्ट केले.
उद्यमनगर, सांगिर्डेवाडी, विठ्ठलवाडी, रॉयल पाम, पिंगुळी गुढीपूर, शेटकरवाडी आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिक बैठकीला उपस्थित होते. नगरपंचायतीने सदरील खासगी जागेतील कचरा डेपो बंद करून डम्पिंग ग्राऊंडवरील कचराही तातडीने हटवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तेथील खासगी जागेतून कचरा किंवा वाहतूक करू नये अशा आशयाचा बॅनर देखील संबंधित जमीन मालकाकडून लावण्यात आला आहे. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन शहरातील कचरा प्रश्नी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!