ठळक घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कुडाळात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) मविआ आक्रमक

‘व्होटचोरी’च्या आरोपांसह निवडणुका रद्द करून फेरनिवडणुकीची मागणी

कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने सोमवारी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांची भेट घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात ‘व्होटचोरी’ करून झालेल्या निवडणुका रद्द करून त्या पुन्हा घेण्यात याव्यात, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली.
       यावेळी माध्यमांशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. “गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी संशयास्पदरित्या वाढली. जर ही वाढीव मते नसती, तर आज परिस्थिती वेगळी असती. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले गेले, त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले; मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. पराभूत उमेदवारांनी यापूर्वीही शंका उपस्थित करून तक्रारी केल्या होत्या. एस.आर.आय. (SRI) सिस्टीमविरोधातही तक्रार देण्यात आली आहे. आगामी निवडणुका निष्पक्ष व चांगल्या प्रकारे व्हायच्या असतील, तर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे,” अशी ठाम मागणी नाईक यांनी केली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना वैभव नाईक म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला असून, अशा अडचणीच्या प्रसंगी आम्ही विरोधाला विरोध न करता सत्ताधारी आणि प्रशासनाच्या पाठीशी उभे राहू. परंतु, दुष्काळाचे राजकारण न करता जनतेच्या हिताचे निर्णय होणे गरजेचे आहे. आंबा व काजू पिकाच्या नुकसानीपोटी आम्ही हेक्टरी २ लाख रुपयांची मदत मागितली होती, परंतु सरकारने केवळ २२ हजार रुपये हेक्टरी दिले. म्हणजेच एका झाडाला १०० रुपयेसुद्धा मिळाले नाहीत. जलजीवन मिशनचे एकही काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे पाणीटंचाई तीव्र होणार आहे. तसेच मागील वर्षी जाहीर झालेली मदतही शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही.”
      या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभु, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, अतुल बंगे,संतोष शिरसाट, सुशील चिंदरकर, बाळा पावसकर,अमित राणे, मंदार शिरसाट, बाळा कोरगावकर, संतोष शिरसाट, अभय शिरसाट, बाळा कनायाळकर, विजय प्रभू, अशपाक कुडाळकर, मंगेश बांदेकर, दीपक आंगणे, सागर भोगटे, शैलेश काळप, संदीप म्हाडेश्वर, एकनाथ धुरी, ममता राऊळ, अवधूत मालंडकर, दीपक धुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

error: Content is protected !!