

‘Bappa.org’ मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाशी घट्ट जोडलेला गणेशोत्सव राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यासाठी bappa.org हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या उपक्रमात केवळ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचीच नव्हे, तर घराघरातील गणेशोत्सवाचीही नोंद केली जाणार आहे. पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या घरगुती गणपतींच्या परंपरा, कुटुंबाची सजावट, स्थानिक लोककला, गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना या डिजिटल संग्रहात स्थान मिळणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार आणि विविध हस्तकला कारागिरांच्या कलेचीही नोंद केली जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना कोणतेही स्वतंत्र ॲप डाऊनलोड करण्याची किंवा क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचा एक चांगल्या दर्जाचा फोटो आणि त्यासोबत गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या दोन ते चार ओळी bappa.org या मंचावर पाठविता येतील.
मंचावर प्राप्त झालेल्या माहितीची संबंधित तज्ज्ञ समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित योगदानकर्त्याच्या नावासह अधिकृत नोंद क्रमांक देण्यात येणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरांची अधिकृत आणि कायमस्वरूपी डिजिटल नोंद तयार होणार आहे. हा संग्रह भावी पिढ्यांसाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला कारागिरांनी आपल्या परिसरातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण माहिती bappa.org या अधिकृत मंचावर नोंदवावी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









