ठळक घडामोडी

सिंधुदुर्गातील मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा; मंदार शिरसाट यांचे सिनेट सदस्यांना निवेदन!

निकाल, गुणपत्रिका अन् पुनर्मूल्यांकनाच्या विलंबाचा घोळ थांबवा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष

सिंधुदुर्ग उपकेंद्रातील सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी

कुडाळ : प्रतिनिधी
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना सविस्तर निवेदन दिले.
       सिंधुदुर्ग जिल्हा मुंबईपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी वारंवार मुंबई येथील विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसवर जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि आर्थिक नुकसान होत असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करण्याची गरज असल्याचे शिरसाठ यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
निकालातील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी
अनेक परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविणे, गुणांमध्ये गल्लत होणे आदी त्रुटी आढळून येतात. या त्रुटी तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
गुणपत्रिका, प्रमाणपत्रांना विलंब
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे महाविद्यालयांमध्ये वेळेत उपलब्ध होत नसल्याने पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरीच्या संधींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुणपत्रिका व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
      पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा निकाल पुढील परीक्षेचे अर्ज भरण्यापर्यंत किंवा कधी कधी पुढील परीक्षा होईपर्यंतही जाहीर होत नसल्याची समस्या विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण होत असून पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया जलद व पारदर्शक करण्याची मागणी करण्यात आली.
       मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र असतानाही अनेक प्रशासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई येथील मुख्य कॅम्पसवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय व शैक्षणिक सेवा जिल्ह्यातच पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
     दरम्यान, संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत थेट संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली व काही समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा निलेश गवळी, मयूर पांचाळ, आनंद वैद्य, अरविंद शिरसाट, श्री. गवस, प्राचार्य स्मिता सुरवसे, नगरसेवक मंदार शिरसाठ, योगेश धुरी, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, विनय पालकर यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाशी संबंधित कोणतीही शैक्षणिक अथवा प्रशासकीय अडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले.

error: Content is protected !!