ठळक घडामोडी

कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी!

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले कोर्ट स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आले.
      कुडाळ येथील कोर्टाची वास्तू आणि परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या परिसराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी असल्याचे विविध दाखले असल्याचा दावा समितीने केला आहे.या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे कार्य आणि जीवनप्रवास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या ठिकाणी संग्रहालय उभारण्याचा मानस समितीने व्यक्त केला आहे.या संग्रहालयामुळे कुडाळसह सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जतन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
     यासाठी शासनाकडून शासकीय तसेच आर्थिक सहकार्य मिळावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रसाद महादेव शिरसाट, उपाध्यक्ष श्री. नितीन शिरसाट, आणि खजिनदार श्री. राजन माडये उपस्थित होते.

error: Content is protected !!