

कुडाळ : उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे नुकताच जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी, सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव आणि प्रमुख अतिथी श्री. अनिल सर्वेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते नारळ रोपाची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी केली. त्यामध्ये त्यांनी जागतिक नारळ दिनाचे महत्त्व विशद केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आंदुर्ले गावातील प्रगतशील नारळ बागायतदार तसेच नारळ कलाकुसर करणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.अनिल सर्वेकर यांचा मा.सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.श्री. सर्वेकर यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी विद्यार्थी वर्गास नारळ झावळापासून विविध आकर्षक वस्तू बनवून दाखविल्या. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी देखील या वस्तू बनविण्याचा आनंद घेतला.अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.विजय दळवी यांनी उपस्थितांना जागतिक नारळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या व नारळाचे महत्त्व विशद केले. नारळ लागवडी बरोबरच भविष्यामध्ये नारळावर प्रक्रिया युक्त उद्योग उभे राहिले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी नारळ मदत करेल असे प्रतिपादन डॉ. विजय दळवी यांनी केले.अखिल भारतीय समन्वित तेल ताड प्रकल्प प्रमुख डॉ. महेश शेडगे यांनी उपस्थितांना तेल ताड या पिकाविषयी थोडक्यात माहिती दिली व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर अतिथी, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी वर्गाचे आभार मानले. त्यानंतर प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते नारळ लागवडीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. देसाई व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अशा प्रकारे जागतिक नारळ दिन मुळदे येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.









