
कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांचा पुढाकार
कणकवली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत घोणसरी येथे शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयांवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रम घेतले.
यावेळी माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत, माती परीक्षण अहवालाचा शेतीतील उपयोग याबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रमाणित बियाणे निवड, बियाण्यांची गुणवत्ता ओळखणे, भेसळयुक्त बियाण्यांपासून बचाव आणि उत्पादनवाढीसाठी निरोगी बियाण्यांचे महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय फळझाडांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असलेल्या बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कॉपर सल्फेट, चुना व पाण्याचे योग्य प्रमाण, मिश्रणाची पद्धत आणि वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमाला घोणसरी येथील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रगतशील शेतकरी कृष्णा एकवडे यांच्या शेतावर झालेल्या कार्यक्रमात प्रकाश हजारे, विकास महाडिक, राघोबा पाटील, प्रतिभा जाधव, शितल साळुंखे, दीक्षा राणे, उदय राणे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज संते, विषय शिक्षिका दर्शना कदम, अस्मिता पाटील, रीना लामतुरे तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. वेदांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कोमल पारकर, सर्वेशा पाटील, मनस्विनी कोंडेकर, श्रुतिका जाधव, प्रणाली ढोले, युगाली वेतोरकर, दीक्षा उबारे, अश्विनी शिंदे व ज्ञानेश्वरी हवालदार यांनी परिश्रम घेतले.








