

महिला प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसुली थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन
ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर यांचा इशारा
कुडाळ : राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात सवलती जाहीर केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष प्रवासादरम्यान तांत्रिक त्रुटींचा फटका महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एसटी वाहकांकडील यंत्रांमध्ये (ETIM) नेटवर्क न मिळाल्यास या सवलतीचे पास स्वीकारले जात नसून, महिला प्रवाशांकडून सर्रास पूर्ण भाडे वसूल केले जात असल्याचा आरोप करीत या प्रशासकीय गोंधळावर व नाहक त्रासावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ उपतालुकाप्रमुख तथा प्रवक्ते श्री. बाळा पावसकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाने तातडीने या समस्येचे निवारण करून महिला प्रवाशांची होणारी ही लूट न थांबवल्यास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही श्री.पावसकर यांनी दिला आहे.
बाळा पावसकर म्हणाले की, ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ‘कुडाळ-निवती’ या बसमध्ये एक संतापजनक प्रकार घडला. या प्रवासादरम्यान वाहकाला नेटवर्क उपलब्ध न झाल्याने, महिला प्रवाशाकडे सवलतीचा पास असूनही वाहकाने तो ग्राह्य धरण्यास नकार दिला व प्रवाशाकडून पूर्ण तिकिटाची रक्कम वसूल केली.
नाहक मानसिक व आर्थिक शोषणाचा आरोप या घटनेचा कडक शब्दांत निषेध करत उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर म्हणाले की, “शासकीय सवलतींचा ढोल पिटणारा एसटी विभाग प्रत्यक्ष प्रवाशांना सेवा देताना मात्र पूर्णपणे अपयशी ठरत आहे. नेटवर्क नसल्याच्या कारणावरून महिला प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारणे हा प्रवाशांवर उघड-उघड केलेला अन्याय आहे. तांत्रिक त्रुटी एसटी महामंडळाची असताना त्याचा भुर्दंड आणि मानसिक त्रास सामान्य प्रवाशांनी का सहन करावा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी बाळा पावसकर यांनी केली आहे. तसेच, महिला प्रवाशांच्या पाठीशी खंबीरपणे आपण ठामपणे उभे आहोत. जनतेने एकत्र येऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.









