ठळक घडामोडी

कुडाळमधील गणेश घाट कामाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच; ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा!

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ शहरातील गणेश घाट बांधकाम व परिसर सुशोभीकरणासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. त्यामुळे लोकार्पण होणाऱ्या गणेश घाटाचे संपूर्ण श्रेय वैभव नाईक यांचेच असून, अन्य कोणीही त्याचे श्रेय घेऊ नये, असा टोला शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाट व शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
      राजन नाईक म्हणाले, कुडाळ शहरवासीयांच्या मागणीनुसार वैभव नाईक यांनी गणेश घाटासाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच भंगसाळ नदीकिनारी सुशोभीकरणासाठी पाच कोटींचा निधीही त्यांनी आणला होता. त्यामुळे गणेश घाटासह या निधीचेही खरे श्रेय वैभव नाईक यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.
       मंदार शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गणेश घाटासाठी पाठपुरावा करण्यात आला. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ९० लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली, तर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कंत्राटदाराला काम देण्यात आले. या कामाची वर्क ऑर्डर वैभव नाईक यांच्या कार्यकाळातच झाल्याने त्याचे श्रेय त्यांनाच जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
      संतोष शिरसाट म्हणाले, वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला. भंगसाळ नदी सुशोभीकरणाच्या कामात गणेश घाट व महापुरुष मंदिर परिसराचा समावेश होता. या कामासाठीही वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता पूर्ण झालेल्या गणेश घाटाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बाळा पावसकर, अतुल बंगे, संदीप म्हाडेश्वर, गुरू गडकर, अमित राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!