

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून साफसफाई मोहीम
सभापती मिलिंद नाईक यांची सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांनी मानले आभार
कुडाळ : प्रतिनिधी
श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कुडाळ तालुक्यातील मुळदे ते बामणादेवी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून साफसफाई करण्यात आली. कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या स्वखर्चातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊ नये, तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित व सुकर मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी मुळदे ते बामणादेवी मार्गावरील झाडी तोडून साफसफाई करण्यात आली.
स्थानिक पंचायत समिती सदस्य तसेच कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत हा पुढाकार घेतला. या स्वच्छतेमुळे रस्त्याच्या दुतर्फा मोकळीक निर्माण झाली असून गणेशोत्सव काळात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक नागरिकांसह चाकरमान्यांनी सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मानले.









