ठळक घडामोडी

आरोग्य व्यवस्था बळकट करून सेवांचा दर्जा वाढवा – आ.निलेश राणे

कुडाळ-मालवण एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ-मालवण तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आरोग्यविषयक समस्या समितीसमोर मांडून त्यावर प्रभावी कार्यवाही करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येईल. बैठकीपूर्वी प्रत्येक सदस्याला ४८ तास अगोदर बैठकीचे इतिवृत्त व विषयपत्रिका देण्यात यावी, जेणेकरून सदस्यांना विषयांचा अभ्यास करून सूचना मांडता येतील, असे निर्देश आ.निलेश राणे यांनी दिले.
      कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी कुडाळ-मालवण तालुका एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची पहिली बैठक आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज झाली. समितीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसह सुमारे ४० सदस्यांचा समावेश आहे.
      या बैठकीला सभापती मिलिंद नाईक, जि.प. उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, उपसभापती सिताराम तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनगे यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी समितीची स्थापना, रचना आणि कामकाजाबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली.

error: Content is protected !!