ठळक घडामोडी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अणाव येथे ज्येष्ठांचा आरोग्य मेळावा!

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; अणाव ग्रामपंचायतीचा उपक्रम

कुडाळ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ग्रामपंचायत अणावच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला.बदलती जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि दैनंदिन जीवनातील बदल यामुळे आरोग्यावर होणाऱ्या विविध दुष्परिणामांबाबत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य उपकेंद्र अणाव यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
     या कार्यक्रमास अणावचे सरपंच श्री. लिलाधर अणावकर, उपसरपंच सौ. आदिती अणावकर, पोलीस पाटील श्री. सुनिल पाटकर,ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रदीप नारकर,ग्रामपंचायत सदस्य श्री. धाकू जाधव, श्री. रावजी जिकमडे व सौ. सुवर्णा परब यांची उपस्थिती होती.आरोग्य उपकेंद्र अणावचे श्री. तांबे, आरोग्य सेविका सौ. धुरी, आरोग्य सेवक श्री. गोठणकर, आशा सेविका श्रीम. सायली पाटकर व सौ. सेजल बागवे यांनी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासाठी सहकार्य केले. ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवाचे आणि मार्गदर्शनाचे भांडार असून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.ग्रामपंचायत अणावने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या आरोग्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!