

कुडाळच्या मातीतून वर्ग-१ अधिकारी घडवणार; मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी मंदार शिरसाट यांचा लढा
पुणे-मुंबईचा खर्च वाचणार; कुडाळमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी विद्यापीठाची दारे ठोठावणार
कुडाळ : सिंधुदुर्गातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि कुडाळच्या मातीतून जास्तीत जास्त वर्ग-१ अधिकारी घडावेत, या उद्देशाने कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुडाळ शहरात मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून एमपीएससी-यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ऑक्टोबरमध्ये कुलगुरूंची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या कुडाळ दौऱ्यादरम्यान संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात मंदार शिरसाट यांनी कुडाळसह सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. यावेळी कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाचे एमपीएससी-यूपीएससी उपकेंद्र किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी कुलगुरूंची भेट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता, क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी असूनही दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी त्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर यांसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. यासाठी विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा खर्च परवडत नसल्याने त्यांना अनेकदा गुणवत्तेचा असूनही संधीपासून दूर राहावे लागते.
याबाबत मंदार शिरसाट म्हणाले, “सिंधुदुर्गातील मुलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. मात्र, जिल्ह्यात सुसज्ज स्पर्धा परीक्षा केंद्र आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे पॅनेल उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. कुडाळ व आसपासच्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ग-१ अधिकारी व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे अधिकृत केंद्र कुडाळमध्ये आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे व बस वाहतुकीने जिल्ह्यातील विविध भागांशी जोडलेले आहे. त्यामुळे कुडाळमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवली तालुक्यांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो, हा मुद्दा मंदार शिरसाट यांनी सिनेट सदस्यांसमोर मांडला. केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व जागा उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक पातळीवर पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ऑक्टोबरमध्ये कुलगुरूंची घेणार भेट!
मंदार शिरसाट यांनी मांडलेल्या मागणीची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी तत्काळ दखल घेतली. सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा गवळी आणि मयूर पांचाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कुलगुरूंसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. ऑक्टोबरमध्ये ही भेट घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान कुडाळमधील विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन, सविस्तर प्रस्ताव तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचा संपूर्ण आराखडा कुलगुरूंसमोर सादर करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, आत्मविश्वास कसा वाढवावा तसेच करिअरच्या विविध संधींची निवड कशी करावी, यासाठी मंदार शिरसाट यांनी यापूर्वी विविध अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सत्रे व तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली होती. या उपक्रमांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या अनुभवातून कुडाळमध्ये कायमस्वरूपी दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची गरज अधोरेखित झाल्याचे सांगत मंदार शिरसाट यांनी आता विद्यापीठ पातळीवर त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.









