

१९८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ; विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक रजत चव्हाण यांचे मानले आभार
कुडाळ : लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी आज आधुनिकतेचे रूप घेत आहे. या लालपरीने आईप्रमाणे साथ दिली असून, आज प्रत्येकाच्या दारासमोर गाडी असली तरी एसटीबद्दलचा जिव्हाळा कमी झालेला नाही, असे प्रतिपादन हिर्लोक गावचे ग्राम महसूल अधिकारी संतोष बांदेकर यांनी केले.
ग्रामपंचायत हिर्लोक-किनळोस आणि विनायक भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हिर्लोक येथे आयोजित NCMC कार्ड नोंदणी शिबिरात ते बोलत होते.
या शिबिरात २३० रुपये किमतीचे NCMC कार्ड ग्रामस्थांना विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केवळ ११५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले. उर्वरित ११५ रुपये प्रतिष्ठानने भरले. या सवलतीचा तब्बल १९८ ग्रामस्थांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपसरपंच नरेंद्र राणे यांनी विनायक भारती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. रजत चव्हाण म्हणाले, गावातील ग्रामस्थांची आई-वडिलांप्रमाणे सेवा करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. सेवा शक्ती एसटी संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भरत चव्हाण यांनी NCMC कार्डबाबत असलेले गैरसमज दूर केले. १४ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्ड काढण्याची मुदत असून, १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान कार्ड काढल्याची पावती दाखवल्यास एसटीच्या सवलतींचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्व प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे नेटवर्क एकाच सर्व्हरवर अवलंबून असल्याने कार्ड नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सुट्ट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठीही हे कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच उदय सावंत यांनीही उपक्रमाचे कौतुक करून ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य अश्विनी सावंत, सरपंच प्राची सावंत, उपसरपंच नरेंद्र राणे, प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र उर्फ बबन कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विजय परब, माजी उपसरपंच मोहन परब, हिर्लोक सोसायटी अध्यक्ष पंढरीनाथ सावंत, उपाध्यक्ष विनोद सावंत, माजी उपसरपंच सूर्यकांत नाईक, गणेश चव्हाण, सीताराम परब, आदेश परब, संदीप सावंत, राघोबा परब, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरात १९८ ग्रामस्थांनी लाभ घेतल्याबद्दल तसेच सवलतीच्या दरात NCMC कार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. रजत चव्हाण यांचे आभार मानले. सूत्रसंचालन तलाठी संतोष बांदेकर यांनी केले, तर आभार उपसरपंच नरेंद्र राणे यांनी मानले.









