ठळक घडामोडी

गणेश चतुर्थी काळात कोणावरही वीज पुरवठा खंडित अथवा वीज बिलाची सक्ती करू नका; कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा

महावितरणकडून सक्ती झाल्यास थेट संपर्क साधा; मंदार शिरसाट यांचे नागरिकांना आवाहन

कुडाळ : कोकणचा सर्वात मोठा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संपूर्ण कुडाळ शहर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना, महावितरण कंपनीकडून वीज बिल वसुलीसाठी नागरिकांकडे सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गणेशोत्सवासारख्या पवित्र आणि आनंदाच्या सणात महावितरणने कुडाळ शहरातील कोणत्याही ग्राहकाला वीज बिल भरण्याची सक्ती करू नये आणि थकबाकीच्या कारणावरून कोणाचीही वीज खंडित करू नये, असा अशी मागणी कुडाळचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.
       नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून चाकरमानी गावी येतात. या काळात प्रत्येक कुटुंबाचा सणाचा खर्च मोठा असतो. आधीच महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना, सणाच्या अगदी तोंडावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावणे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देणे अत्यंत निषेधार्ह आहे.
      बाप्पाच्या उत्सवात घर आणि परिसर प्रकाशाने उजळून निघणे हा नागरिकांचा हक्क आहे. सण संपेपर्यंत महावितरणने आपली वसुलीची सक्ती पूर्णपणे थांबवावी. जर सणाच्या काळात कुडाळमधील एकाही घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकाची वीज कापली, तर महावितरण अधिकार्‍यांना ठाकरे शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाईल, असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.
       मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, “गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जर महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने तुमच्याकडे वीज बिलासाठी सक्ती केली, वीज कापण्याची धमकी दिली किंवा वीज पुरवठा खंडित केला, तर तातडीने माझ्याशी संपर्क साधा. नागरिकांच्या हक्कासाठी मी स्वतः महावितरणच्या दारात उभा राहीन.”महावितरणच्या उच्च अधिकार्‍यांनी आपल्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना तातडीने आदेश देऊन गणेशोत्सव संपेपर्यंत ही वसुली मोहीम थांबवावी आणि सलोख्याचे वातावरण राखावे, अशी मागणी मंदार शिरसाट यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!