ठळक घडामोडी

गणेशोत्सवापूर्वी कुडाळ शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नगरपंचायतीला निवेदन

कुडाळ : प्रतिनिधी
      श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात कुडाळ बाजारपेठेत नागरिक व वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
      कुडाळ शहरात सध्या मोकाट गुरे-वासरांचा वावर वाढला असून, यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला बसणारे गरीब भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या साहित्याचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
       गणेशोत्सव काळात बाजारपेठेत गर्दी वाढणार असून, मुख्य रस्ते व चौकांमध्ये बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीने तातडीने या जनावरांना पकडून त्यांची कोंडवाडा किंवा गोशाळेत व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर आदी उपस्थित होते. प्रशासनाने लोकहिताच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!