

कुडाळ : प्रतिनिधी
भंगसाळ नदीकाठी साकारण्यात आलेल्या गणेश घाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कुडाळ शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा नेवाळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश घाटाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याने कुडाळच्या विकासासाठी हे एक नवे पर्व ठरेल, अशी अपेक्षा नेवाळकर यांनी व्यक्त केली आहे. कुडाळ शहराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी भंगसाळ नदी परिसरात विविध सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गणेश घाटालगत असलेला ब्रिटिशकालीन जुना पूल सध्या पडलेल्या अवस्थेत असून, या ऐतिहासिक ठिकाणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वेंगुर्लेच्या धर्तीवर या परिसरात आकर्षक पर्यटन प्रकल्प (झुलता पूल) उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक रहिवाशांना रोजगाराच्या व आर्थिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील, असे नेवाळकर यांनी म्हटले आहे. तसेच भंगसाळ नदीकाठी कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या धर्तीवर आकर्षक कारंजे उभारावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे नदी परिसराच्या सौंदर्यात भर पडून कुडाळ शहरातील पर्यटनाला नवी ओळख मिळू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कुडाळचे आराध्यदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण करावे तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही नेवाळकर यांनी केली आहे.
कुडाळ शहराला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी या विकासकामांची आवश्यकता असून, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास दादा नेवाळकर यांनी व्यक्त केला. कुडाळच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल त्यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले असून, यापुढेही त्यांच्या माध्यमातून कुडाळच्या विकासासाठी अशीच कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.









