

जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जाहीर; आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीला प्रतिबंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये अधिसूचना काढून कुडाळ शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश पुढील सूचना होईपर्यंत लागू राहणार आहेत.
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शहरातील बाजारपेठ ही जिल्ह्यातील प्रमुख व जुनी बाजारपेठ आहे. शहरात मोठी रुग्णालये, उच्च शिक्षणाच्या नामांकित संस्था तसेच कुडाळ रेल्वे स्थानक असल्याने नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच कुडाळ एमआयडीसीमध्ये ३५० हून अधिक कंपन्या कार्यरत असून, मालवण तालुक्यातील खाणींमधून चिऱ्यांची वाहतूक कोल्हापूर, गोवा व कर्नाटकच्या दिशेने कुडाळमार्गे होत असते.
अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कुडाळ शहरात येण्यासाठी तसेच मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी असलेले रस्ते अरुंद आहेत. शहरात अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था किंवा पार्किंगची सुविधा नसल्याने एमआयडीसीतील साहित्याची वाहतूक, चिऱ्यांची वाहतूक आणि अन्य अवजड वाहने मुख्य बाजारपेठेतून ये-जा करतात. त्यात बाजारपेठेतील रस्त्यांवरील किरकोळ दुकाने आणि वाढती वर्दळ यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
१ सप्टेंबरच्या बैठकीनंतर निर्णय
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या अध्यक्षतेखाली १ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत कुडाळ शहरातील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य बाजारपेठ व कुडाळ-मालवण रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियमन लक्षात घेऊन अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
असा असेल अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
१) एसआरएम कॉलेज एमआयडीसी मार्गे वाहतूक :
कुडाळ शहरात होणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक कुडाळ मुख्य बाजारपेठेत न आणता एसआरएम कॉलेज येथून एमआयडीसी मार्गे मालवण व वेंगुर्ला या दिशेने वळविण्यात येणार आहे.
२) मालवण-कुडाळ मार्गावरील वाहतूक :
मालवण-कुडाळ रस्त्यावरील अवजड वाहतूक नेरूर जकात नाका – छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमआयडीसी) – हॉटेल अन्नपूर्णा – विनायक सुझुकी शोरूम – हॉटेल सदिच्छा – एस. एन. देसाई चौक – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ या मार्गाने वळविण्यात येणार आहे.
दिशादर्शक फलक, वाहतूक चिन्हे लावणार
मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११६ नुसार पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले रस्ते तसेच पर्यायी मार्ग नागरिकांच्या निदर्शनास यावेत यासाठी योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेतचिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांवरही जबाबदारी
पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावरील वाहतुकीचे चोख नियमन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.









