

भारूड, प्रश्नोत्तरांनी रंगला पारंपरिक डबलबारी भजन सामना
सायबर फसवणुकीबाबत पोलिसांकडून जनजागृती
कुडाळ : प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वर्षभर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी सायंकाळी भक्तिरसाचा माहोल निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ७९ वर्षांची परंपरा लाभलेल्या पारंपरिक डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारूड, पारंपरिक भजन आणि प्रश्नोत्तरांच्या रंगतदार फटकाऱ्यांनी डबलबारी रंगली.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री महापुरुष मंदिरात गणेशोत्सवानिमित्त २१ दिवस गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाच्या २०व्या दिवशी सत्यनारायण महापूजा आणि भारूडसहित प्रश्नोत्तर पारंपरिक डबलबारी आयोजित करण्याची प्रथा गेली ७८ वर्षे सुरू आहे. यंदा या परंपरेचे ७९वे वर्ष आहे.
यंदाच्या डबलबारीत पोभुर्ले-देवगड येथील भजनी बुवा सूरज खांडेकर आणि कातवण-देवगड येथील भजनी बुवा सुशांत जोईल यांच्यात सामना रंगला. डबलबारीचे उद्घाटन कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
पहिल्या बारीचा मान बुवा सुशांत जोईल यांनी सांभाळला. दोन्ही बुवांनी आपल्या सुरेल गायनातून भारूड, पारंपरिक भजन तसेच प्रश्नोत्तरांची रंगत वाढवत रसिकांना खिळवून ठेवले. गायनासोबत पखवाज, तबला आणि अन्य वाद्यांच्या साथीने परिसर भक्तिमय झाला. प्रश्नोत्तरांच्या फटकाऱ्यांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. रात्री उशिरापर्यंत हा भजनाचा सामना सुरू होता.
डबलबारीपूर्वी बुवा सूरज खांडेकर, बुवा सुशांत जोईल तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील व अन्य मान्यवरांचा कुडाळ पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुडाळ पोलीस ठाण्यातील डबलबारीची जुनी परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न अधिकारी व कर्मचारी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सुमारे आठ वर्षांपूर्वी कुडाळ पोलीस ठाण्यात बुवा समीर कदम यांनी डबलबारी सादर केली होती. त्यांचे अलीकडे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तेंडुलकर यांनी केले.
यावेळी सायबर ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, उपनिरीक्षक जनार्दन झारापकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, हवालदार मंगेश जाधव, कुडाळ पोलीस पाटील अनंत कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश म्हाडेश्वर, दीपक भोगटे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भजन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
डबलबारीच्या कार्यक्रमादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली तसेच विविध कर्ज अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक होत असल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.









