

गणेश मूर्ती विसर्जनाचा घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणाही तैनात
कुडाळ : प्रतिनिधी
दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कुडाळ शहरातील गणेश घाटावर सुरू असलेल्या विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भंगसाळ नदीकिनारील गणेश घाटावरील परिस्थितीचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विसर्जन व्यवस्थेची माहिती घेतली.
गणेशभक्तांना विसर्जनावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, सुरक्षितता अबाधित राहावी तसेच विसर्जन सोहळा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा, यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच कुडाळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून विसर्जनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
दरम्यान कुडाळ शहरातील प्रत्येक गणेशभक्ताच्या श्रद्धेचा आणि भावनेचा आदर राखत, प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने गणेश विसर्जनाचा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे, याचा मनापासून आनंद आहे, अशी भावना यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केली.









