ठळक घडामोडी

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; सिंधुदुर्गात अकरा दिवसांच्या गणरायांना निरोप!

ढोल-ताशांचा गजर; फटाक्यांची आतषबाजी अन् भक्तिमय वातावरण बाप्पाचा जयघोष

सिंधुदुर्ग : ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
      कोकणातील गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात जपली जाते. गेल्या अकरा दिवसांपासून घरोघरी मनोभावे पूजन केलेल्या श्री गणेशमूर्तींचे गुरुवारी भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या आठही तालुक्यांत शहरासह ग्रामीण भागात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी विसर्जनापूर्वी सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत भावपूर्ण निरोप दिला.
       कुडाळच्या गणेश घाटावर गर्दी
     कुडाळ शहरातील भंगसाळ नदीकाठावरील गणेश घाटावर गणेश विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. शहरातील दहा गणेश घाटांसह तालुक्यातील नदी, तलाव, ओहोळ आदी विविध ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळपासून सुरू झालेला विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्त भावूक झाल्याचे चित्र विविध ठिकाणी पाहायला मिळाले. महिला, पुरुष, युवक तसेच बालगोपाळ मोठ्या उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विसर्जनस्थळी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी तसेच विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

error: Content is protected !!