

पाणीटंचाई रोखण्यासाठी नगरपंचायतीचा ‘ॲक्शन प्लॅन’
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अर्धा तास पाणी कपातीचा निर्णय
कुडाळ : चालू वर्षातील हवामानातील बदल आणि संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ शहरात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने ठोस आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या असल्याची माहीती नगरपंचायत प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.
कुडाळ तालुक्याचा दुष्काळ कळ – 1 मध्ये समावेश झाल्यामुळे विविध उपापयोजना राबविण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीमार्फत आज न.पं त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये विविव उपापयोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात पावशी धरण व भंगसाळ नदी मधील पाणीसाठा जपून वापरणे आवश्यक असल्याने सद्यस्थितीमध्ये नियमित कालावधीपेक्षा अर्धा तास पाणी कपात करण्यात येणार आहे. कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढविणे साठी शहरातील विविध ठिकाणी बंधारे घालणेत येणार आहेत. यामध्ये कुंभारवाडी, कविलकाटे, नाबरवाडी, तुपटवाडी येथील बंधारा घालण्यासाठी योग्य ठिकणांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध अशासकीय संस्था, शहरातील नागरिक तसेच उद्योजक, पत्रकार समिती, व्यापारी संघ, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. कुडाळ शहरातील विविध ठिकाणी नगरपंचायत च्या मालकीच्या जागेमध्ये जलतारा प्रकल्प राबविणेत येणार आहेत. तसेच नागरिकांना मार्च एप्रिल मे च्या दरम्याने पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर भाड्याने घेण्याची आवश्यकता भासल्यास त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील नगरपंचायत मालकीच्या बारमाही असलेल्या विहिरी मधील गाळ उपसा करून आवश्यकतेनुसार शहरात पाणीपुरवठा करणेत येणार आहे.शहरातील जलवाहिनीना गळती असल्यास त्याची दुरुस्ती करण्याचे काम चालू असून अशा गळतीबद्दल नागरिकांनी माहिती द्यावी असे आवाहन देखील नगरपंचायत द्वारे करण्यात येत आहे. यासाठी नगरपंचायतचा टोल फ्री क्रमांक 18002331436 यावर संपर्क साधावा .याव्यतिरिक्त शहरात वृक्षारोपण करणे, अनधिकृत नळ कनेक्शन असल्यास तत्काळ खंडित करणे, शहरात पाणी वाचवा पाणी अडवा ई. पाणी संवर्धनासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे. तसेच नळ कनेक्शनमधून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहीती नगरपंचायतीकडून देण्यात आली.









