

वन्यजीव संरक्षणाचा आदर्श; वनविभागाकडून ग्रामस्थांचे कौतुक
कुडाळ : वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत सुरू असलेल्या जनजागृती व सेवा संकल्प अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, झाराप-मुंडयेवाडी येथे आज विहिरीत पडलेल्या खवले मांजराची स्थानिक ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली.
झाराप-मुंडयेवाडी येथील प्रविण रेडकर यांच्या घराशेजारील विहिरीत खवले मांजर पडल्याची माहिती झाराप येथील अनिकेत तेंडोलकर यांनी वनपाल नेरूर तर्फ हवेली यांना दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच प्रविण रेडकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी काठीच्या सहाय्याने खवले मांजराला विहिरीबाहेर सुरक्षित काढले आणि वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. वनअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सदर खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकारी, कुडाळ यांच्याकडून तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.
वन्यजीव सप्ताह २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत वनविभाग सावंतवाडी अंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम तसेच सेवा संकल्प अभियानाचे उपक्रम उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. या उपक्रमांमुळे वन्यजीवांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे या घटनेतून दिसून आले. हा उपक्रम उपवनसंरक्षक मिलीना शर्मा, सहायक वनसंरक्षक सुनील लाड आणि वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या बचाव मोहिमेत वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक प्रसाद पाटील, वनरक्षक समीर खरवत, वनसेवक यशवंत कदम, जलद कृती बचाव पथक कुडाळचे सदस्य तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रविण रेडकर, उदय मुंडये, विनय मुंडये, सुरेश रेडकर, महेश मुंडये, रमेश मयेकर, भीमराव मुंडये, धनेश पालकर, रमेश पालकर, संतोष शिंदे, महादेव बुटे आदी सहभागी झाले होते.









