

‘शिक्षकांचा वेळ ऑनलाइन कामात नव्हे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी द्या’; शिक्षकांचा एल्गार
स्वयंपाकींचे प्रलंबित मानधन, पाठ्यपुस्तके, वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन
कुडाळ : तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व शालेय व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कुडाळच्या वतीने आज बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘शिक्षकांचा वेळ प्रशासकीय माहिती भरण्यात नव्हे, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यात जावा’, अशी भूमिका समितीने मांडली. प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती योजनेतील स्वयंपाकी व मदतनीसांचे जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, अपूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, शिक्षकांचे वेतन व सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
शिक्षकांना शैक्षणिक वेळेत अनावश्यक ऑनलाइन कामे देऊ नयेत, ऑनलाइन कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कुडाळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील हेड क्लर्कचे रिक्त पद तातडीने भरावे, अशी मागणीही करण्यात आली. शाळांच्या किचनशेड दुरुस्तीसाठी अनुदान, समग्र शिक्षा व गणवेश योजनेचे प्रलंबित अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, स्वयंपाकी संघाच्या नेत्या कमलताई परूळेकर, तालुकाध्यक्ष शशांक आटक, तालुका सचिव महेश गावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित करीत शासनाने मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. दरम्यान कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शासनस्तरावरून मागण्या सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्य महासचिव राजन कोरगावकर, राज्य सदस्य सचिन मदने, जिल्हा सचिव आपा सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संगिता राऊळ, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संजना पेडणेकर, सचिव सुगंधा अणावकर, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे, कार्याध्यक्ष महेश कुंभार, धोंडी मसुरकर, संतोष तेरसे, एकनाथ सावंत यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









