

पोषण माहनिमित्त कुडाळात जनजागृतीचा जागर; आहारातील विविधता, प्रथिने आणि तृणधान्यांचा संदेश
कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प, कुडाळ यांच्यातर्फे नवव्या ‘पोषण माह’ अभियानानिमित्त लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि योग्य आहाराबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी कुडाळ शहरात आज बुधवारी पोषण आहार रॅलीचे आयोजन करण्यात आले. “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या मुख्य संकल्पनेवर आधारित ही रॅली काढण्यात आली होती.
बालकांचे आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकास ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची, स्वयंसेवी संस्थांची आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित जबाबदारी आहे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. हातात फलक घेऊन अंगणवाडी सेविकांनी शहरात जनजागृती केली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कुडाळ यांच्यामार्फत पोषण माह अंतर्गत पोषण मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचायत समिती कुडाळ सभापती मिलिंद नाईक उपसभापती सीताराम तेली, जि.प.सदस्या आरती पाटील, पं.स.सदस्या अर्चना घावनळकर व करुणा पावसकर, पर्यवेक्षिका ललिता कासले, शर्मिला वळवी, राखी राणे आर्यशिला देऊलकर, मंगला सुतार व अक्षय कानविंदे उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षिका देऊलकर यांनी सामाजिक संस्थांचा मुलांच्या संगोपनातील सहभाग तसेच मुलांच्या पोषण व आरोग्य बाबत मार्गदर्शन केले
९ वा राष्ट्रीय पोषण माह,’आमची अंगणवाडी आमची जबाबदारी’या अंतर्गत पाच थीमवर काम करण्यात आले. त्यामध्ये आहाराची विविधता प्रथिने आहाराचा समावेश. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, अंगणवाडी दिला जाणारा गरम ताजा आहार, स्थानिक संस्था समुदाय यांची मालकी व जबाबदारी. याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पंचायत समिती ते कुडाळ स्टॅन्ड पर्यंत जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. टीएचआर पाककृती, तृणधान्य व रानभाज्या पाककृती पोषण आरती, जनजागृती पर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.









