ठळक घडामोडी

कुडाळ शहराच्या कचरा प्रश्नावर सकारात्मक तोडगा; नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश!

शहरातील कचरा संकलन आजपासून सुरळीत सुरू

नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेलकर-शिरवलकर यांची माहीती

कुडाळ : कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या अडचणीवर नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी प्रशासनाच्या सहकार्याने सकारात्मक तोडगा काढण्यात यश मिळविले आहे. सांगीर्डेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरात असलेल्या जागेच्या संबंधित जमीन मालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन जमीन मालकांनी सहकार्याची भूमिका घेत नगरपंचायतीला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यास सहमती दर्शविली आहे. यामुळे कुडाळ शहरातील कचरा उचलण्याचे काम आजपासून पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहीती नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी दिली.
       या सकारात्मक तोडग्यासाठी संबंधित जमीन मालकांचे सहकार्याबद्दल नगराध्यक्षांनी विशेष आभार मानले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल तहसीलदार श्री. सचिन पाटील व श्री. कुंटे यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. दरम्यान, कुडाळ नगरपंचायतीचा MIDC येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला आवश्यक नियोजन व कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कुडाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला कायमस्वरूपी आणि अधिक प्रभावी दिशा मिळणार आहे.
      नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, कुडाळच्या नागरिकांच्या आरोग्याशी, स्वच्छतेशी आणि सार्वजनिक हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही मतभेदांपेक्षा कुडाळ शहराचा विकास आणि नागरिकांचे हित महत्त्वाचे असून, भविष्यातही अशाच प्रकारे संवाद, समन्वय आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविले जातील. गेल्या दोन दिवसांत कचरा प्रश्नावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही गैरसमज, अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचे प्रयत्न झाले असले, तरी कुडाळच्या सुज्ञ नागरिकांनी वस्तुस्थिती समजून घेत प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेला पाठिंबा दिला आहे, असेही नगराध्यक्षांनी नमूद केले.
       “कुडाळच्या नागरिकांना कोणत्याही प्रश्नावर वेठीस धरले जाऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. राजकीय मतभेद किंवा व्यक्तिगत कुरघोड्यांपेक्षा जनतेचे आरोग्य, शहराची स्वच्छता आणि विकास यांना आम्ही प्राधान्य देऊ. कुडाळ शहराच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने सुरू राहतील,” असा विश्वास नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केला.
        आमदार श्री. नीलेश राणे यांच्या खंबीर नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कुडाळ शहरात सुरू असलेल्या विकासकामांना अधिक गती मिळत असून, आगामी काळात विकासाचा आलेख आणखी उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुडाळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न तात्पुरता सोडविण्यासोबतच कायमस्वरूपी घनकचरा प्रक्रिया व्यवस्थेसाठी MIDC येथील प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा नगरपंचायतीचा निर्धार असून, त्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांशी समन्वय साधून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कुडाळवासियांचे आरोग्य, स्वच्छता आणि शहराचा विकास हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपंचायत प्रशासन कटिबद्ध आहे, असा विश्वास नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!