

तीन भरलेल्या होड्या नदीपात्रात बुडविल्या; दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या
कुडाळ : कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात आज दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृत वाळू उपशाविरोधात कारवाई केली.
उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार श्री. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी कुडाळ, मंडळ अधिकारी पिंगुळी, ग्राम महसूल अधिकारी कुटगाव, नेरूर, चेंदवण, वालावल तसेच संबंधित पोलिस पाटील यांच्या पथकाने नेरूरपार जेटी परिसरात पाहणी केली. कारवाईदरम्यान नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण ५ होड्या आढळून आल्या. सदर वाळूने पूर्ण भरलेल्या होड्या महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात बुडविल्या. तर दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या.
अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी व कारवाई करण्यात येत असून, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









