ठळक घडामोडी

पोषण हा प्रत्येक कुटुंबाचा आणि समाजाचा विषय व्हावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

‘राष्ट्रीय पोषण माह’चा कणकवलीत जिल्हास्तरीय समारोप उत्साहात

कणकवली : लहान बालके, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी सकस व संतुलित आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पोषणाबाबत व्यापक जनजागृती केल्याशिवाय सुदृढ आणि निरोगी पिढी घडविणे शक्य नाही. त्यामुळे पोषण हा केवळ एका विभागाचा विषय न राहता प्रत्येक कुटुंबाचा आणि समाजाचा विषय झाला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
        सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात उत्साहात राबविण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा जिल्हास्तरीय समारोप कार्यक्रम कणकवली येथे झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती सदस्य, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
      सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
       समारोपावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण माह अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण आणि तालुकास्तरावर पोषणाचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचविण्यात आल्याचे सांगितले. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहाराच्या सवयी बदलत असून, फास्ट फूड व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा वाढता वापर आरोग्यासाठी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टिक अन्नपदार्थांचा तसेच भरड धान्यांचा आहारात अधिकाधिक समावेश करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांनी विविध उपक्रम, स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून पोषणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
      दररोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा : अध्यक्ष प्रमोद कामत
      प्रत्येक कुटुंबाने पोषणाला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याची गरज आहे. रोजच्या जेवणात किमान एक हिरवी भाजी आणि एक फळ घेण्याचा संकल्प करावा. मुलांना जंक फूड देण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेले पौष्टिक व संतुलित अन्न देण्याची सवय लावावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
     पहिले १ हजार दिवस महत्त्वाचे : मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर
       आपण जे खातो त्यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. आजच्या काळात फास्ट फूडचे सेवन वाढत असले तरी शरीराला आवश्यक असलेले डाळी, भात, विविध भाज्या, फळे, दूध, अंडी यांसारखे पोषक पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. बालकाच्या जन्मापूर्वीपासून ते दोन वर्षांचे होईपर्यंतचा कालावधी म्हणजे पहिले १ हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत आई आणि बालकाला योग्य पोषण मिळणे म्हणजेच कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला बळ देणे होय, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी सांगितले.
         कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘अक्षय पात्र’ ही संकल्पना राबविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. तसेच ‘पोषण परी’, ‘पोषण वासुदेव’ आणि ‘पोषण सेल्फी पॉईंट’ हे उपक्रम उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. पोषणाचा संदेश लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने पोहोचविणाऱ्या या उपक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. महिलांनी सादर केलेल्या फुगडी, पारंपरिक नृत्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महिला लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घेतला.
        कार्यक्रमाच्या शेवटी पोषण अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पोषणाचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि निरोगी पिढी घडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
         मिलेट अर्थात भरड धान्याच्या आहारातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी यावेळी मिलेट पाककला स्पर्धा आणि मिलेट रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असलेल्या नाचणी, बाजरी, ज्वारी यांसारख्या भरड धान्यांपासून विविध पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करता येतात, हा संदेश पाककला स्पर्धेतून देण्यात आला. तर रांगोळीच्या माध्यमातून पोषण, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश सर्जनशील पद्धतीने मांडण्यात आला. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पोषणाचे महत्त्व केवळ सांगितले जात नाही, तर ते दैनंदिन आहाराशी जोडले जाऊन कुटुंबापर्यंत प्रभावीपणे पोहोचते.

error: Content is protected !!