
जि.प.कृषी समिती सभेत सभापती दादा साईल यांचे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनली असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना संथ गती असल्याने जि.प. कृषी समितीच्या बैठकीत कृषी समिती सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज प्रशासनाला धारेवर धरले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे बैठकीला अनुपस्थित असल्याबाबत श्री.साईल यांनी संताप व्यक्त करीत बैठकीतूनच त्यांना फोन करून १० ऑक्टोबरपर्यंत भातशेती नुकसानीच्या सर्व पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज तुकाराम उर्फ दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृषी समितीची मासिक सभा झाली. यावेळी जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे, जिल्हा कृषी अधिकारी दिशांत कोळप, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, विजय नाईक, श्रीमती गवस, सुजाता पडवळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ १० हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. याबाबत साईल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. “१० ऑक्टोबरपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण झालेच पाहिजे. कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. कुडाळ तालुक्यात १२ हजार १३४ हेक्टरपैकी ४ हजार २४१ हेक्टर म्हणजेच ३५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात २ हजार ४७२ हेक्टरपैकी केवळ २४६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मालवणमध्ये २७ टक्के, देवगड १८.७० टक्के, सावंतवाडी १४ टक्के, कणकवली १३ टक्के, वैभववाडी १२ टक्के आणि दोडामार्गमध्ये ११.६३ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह आत्मा विभागाचे प्रतिनिधी, फळ संशोधन विभागाचे अधिकारी आणि उपवनसंरक्षक बैठकीला अनुपस्थित राहिल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. कृषी समितीच्या बैठकीला सर्व संबंधित अधिकारी नियमित उपस्थित राहून कामकाजाला गती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पंचनाम्यांचे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्यांना उर्वरित पीक कापून घरी नेता येणार नाही. त्यामुळे सर्व तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनाम्यांना गती देण्याच्या सूचना साईल यांनी दिल्या.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात २०० बंधारे, तर कृषी विभागाला १५० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ८ हजार वनबंधाऱ्यांपैकी २ हजार ४७३ बंधारे पूर्ण झाले आहेत. कृषी सहाय्यकांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन बंधारे बांधावेत आणि पुढील महिनाभर त्यामध्ये पाणी साचून राहते की नाही, याची दैनंदिन पाहणी करावी. “मी स्वतः कोणत्याही साईटवर अचानक जाऊन पाहणी करेन. बंधारा एकाने बांधायचा आणि बोर्ड दुसऱ्याने लावायचा, असा प्रकार चालणार नाही,” असा इशारा श्री. साईल यांनी दिला.
रस्त्यालगतच्या झाडांचा अहवाल मागविला!
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील व्हीआर व एमडीआर रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश साईल यांनी दिले. यावेळी सदस्य संदीप गावडे यांनी नवीन झाडे लावण्यापेक्षा आधीची झाडे जगविण्यावर भर द्यावा, अशी सूचना केली. तसेच जिल्ह्यातील सर्व हवामान केंद्रांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक यांनी कृषी समितीच्या बैठकीला सर्व सदस्य व अधिकाऱ्यांनी नियमित उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती केली. तर सुजाता पडवळ यांनी तुळस-काजरमाळी तलावातील गाळ उपसण्याची मागणी केली.









