
‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाला दिले पाठबळ
कुडाळ : वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि मित्रमंडळींची गर्दी, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, कुडाळ शहरातील युवा उद्योजक शिवम म्हाडेश्वर गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. यंदाही त्यांनी वाढदिवसानिमित्त नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कुडाळ गांधी चौक येथील स्टँडसमोरील सेल्फी पाॅइंट येथे आज हा उपक्रम राबविण्यात आला. मिशन आधार सिंधुदुर्ग संस्थेच्या ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाला पाठबळ देत नागरिकांना कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या. माठेवाडा मित्र मंडळ व प्रभावळकर वाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मिशन आधार सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष सम्राट कुडतरकर यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा अतिवापर घातक असून, ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून अभियानात सहभागी व्हावे व जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हाप्रचारक वैभव पाटील, कुडाळ हायस्कूलचे शिक्षक जी. बी. शिरसाट, कैवल्य म्हाडेश्वर, प्रथमेश कांबळी, अरविंद करलकर, रोहित भोगटे, मयूर कुडतरकर, अनिस सावंत, जितेंद्र यादव, तन्मय सावंत, नितीन सोलकर, मंदार सावंत, कौस्तुभ राठोड, अन्वी सावंत, नमिता बिडये, जयराज म्हाडेश्वर, रोहित सावंत, आकाश नाईक, साई तळवणेकर, हर्षद कुडतरकर यांच्यासह माठेवाडा मित्र मंडळ, प्रभावळकर वाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते.
यावेळी शिवम म्हाडेश्वर म्हणाले की, आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी योगदान दिले पाहिजे. मिशन आधार सिंधुदुर्ग संस्थेकडून गेल्या अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे सामाजिक कार्य सुरू असून, ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या सामाजिक उपक्रमांना मित्रमंडळींचे सातत्याने सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.








