
नाना पाटेकर यांच्या कार्याला कृतीतून श्रद्धांजली
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सहभागातून जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील काळसे येथे नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे संवर्धन व त्याचा सुयोग्य वापर करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्याचे श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांसह शिवाजी विद्यामंदिर काळसे येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जलसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून नद्या, नाले यांचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच विविध जलसंधारणाची कामे त्यांनी राज्यभर केली. जलसंवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवत काळसे येथे प्रत्यक्ष श्रमदानातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
काळसे गावातील नैसर्गिक झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवण्यासाठी तसेच उपलब्ध जलस्रोताचा स्थानिक पातळीवर सुयोग्य उपयोग करता यावा, यासाठी नाल्यात साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचे संधारण होणे, जलस्रोतांची स्वच्छता राखणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी अशा स्थानिक पातळीवरील उपाययोजनांना महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, जलस्रोतांची स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याबाबत प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन मिळाले. केवळ जलसंधारणाची माहिती देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदानात सहभागी होऊन जलस्रोत संवर्धनाचा अनुभव घेतला. जलसाक्षरतेचे हे संस्कार भविष्यातील पिढीला पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी अधिक जबाबदार बनविण्यास उपयुक्त ठरणार आहेत.
या श्रमदानात काळसे ग्रामस्थ, शिक्षक, कृषी, महसूल व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, सरपंच विशाखा काळसेकर, मुख्याध्यापक अविनाश परब, माजी सभापती राजेंद्र परब, शिक्षक प्रथमेश देसाई, स्नेहा सरमळकर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.









