ठळक घडामोडी

संकटात साथ! संजय सावंतांच्या मदतीला धावले गॅरेज व्यावसायिक बांधव!

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनकडून आर्थिक मदत

आगीत गॅरेजचे झाले होते मोठे नुकसान

कुडाळ : अचानक लागलेल्या आगीत गॅरेजमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुडाळ शहरातील संजय सावंत यांच्या मदतीला कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन धावून आले. असोसिएशनच्या वतीने आर्थिक मदत देत सावंत यांना गॅरेज व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी आधार देण्यात आला.
     अनंत मुक्ताई समोरील गॅरेजला लागलेल्या आगीत सावंत यांचे मोठे नुकसान झाले असून, मेहनतीने उभा केलेला व्यवसाय क्षणात उद्ध्वस्त झाला. या संकटाच्या काळात ‘आपला व्यावसायिक बांधव पुन्हा उभा राहावा’, या भावनेतून असोसिएशनच्या सदस्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत जमा केली आणि ती सावंत यांच्याकडे सुपूर्त केली.
      मदत स्वीकारताना संजय सावंत भावूक झाले. संकटाच्या काळात व्यावसायिक बांधवांनी दिलेल्या या आधारामुळे पुन्हा व्यवसाय उभा करण्याचे बळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमातून व्यावसायिक बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
      यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप तेंडोलकर, सचिव गुरुनाथ धुरी, सागर तुळसकर, मोहित मेथर, घनश्याम वांगणकर, शहर कमिटी अध्यक्ष दिवाकर मांजेकर, संजय धुरी, शंकर सातार्डेकर, दर्शन शेलटे, राजू कुडाळकर, दादा दळवी, महेश मिटकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!