
कोमसाप कुडाळ आणि पाट हायस्कूल यांचे आयोजन
मराठी अभिजात भाषा सप्ताहाचे निमित्त
कुडाळ : मराठी भाषा अभिजात सप्ताहाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ आणि एस एल देसाई विद्यालय पाट यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कुलमध्ये आज अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत कु. स्पृहा संदेश नाईक या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक मिळविला. या अभिवाचन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. अभिजात मराठी भाषा या विषयावर को .म .सा.प कुडाळ शाखेचे अध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अभिजात मराठीचे महत्व अधोरेखित झाले.
कोमसाप कुडाळ शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पाट हायस्कुलचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, जि प सदस्य तथा ज्येष्ठ शिक्षिका यज्ञा साळगावकर, पत्रकार तथा आकाशवाणी निवेदक निलेश उर्फ बंड्या जोशी, कोमसाप सदस्य साईप्रसाद वेंगुर्लेकर. ज्येष्ठ शिक्षिका जान्हवी पडते, शिक्षिका सौ. सामंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी केले. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका जान्हवी पडते यानी विद्यालयात मराठी भाषेच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा, वाचन वाचन प्रेरणा दिन, काव्य लेखन, मराठी राज्यभाषा दिन इत्यादी विविध मराठी विषयाच्या उपक्रमांची माहिती दिली. सौ यज्ञा साळगावकर तसेच को.म.सा.प. सदस्य साईप्रसाद वेंगुर्लेकर यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पत्रकार आणि आकाशवाणीचे निवेदक निलेश जोशी यांनी अभिवाचन कसे करावे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
अभिवाचन स्पर्धेमध्ये विद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धत प्रथम क्रमांक स्पृहा संदेश नाईक, द्वितीय क्रमांक भक्ति योगेश तेलीकोचरेकर, तृतीय क्रमांक मीरा महादेव सामंत आणि उत्तेजनार्थ कुमारी वैभवी सहदेव प्रभू या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
अभिजात भाषा या विषयावर को .म .सा.प कुडाळ शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच को.म.सा.परिषदेच्या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली.अभिजात भाषा म्हणजे काय हे सांगून अभिजात मराठी भाषेचा दर्जा अबाधित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सळसकर यांनी केले तर आभार विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. दीपिका दत्तगुरु सामंत यांनी मानले .








