ठळक घडामोडी

कणकवलीतील बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथे आढळला!

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता सचिन माने (वय ३८) यांचा मृतदेह आज रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास बिडवाडी- हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. कणकवली पोलीस ठाण्यात त्या सेवा बजावत होत्या. त्यांच्या समवेत पती सचिन माने हे पोलीस दलात सेवेत आहेत. मात्र, स्मिता माने यांनी आत्महत्या का केली?याचे नेमके कारण समजू शकले नाही.
      मिळालेल्या माहितीनुसार, महिला हवालदार स्मिता माने व त्यांचे पती पोलीस सचिन माने या दोघांची नुकतीच वैभववाडी पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. त्यामुळे ते दोघेही वैभववाडीत प्रशासकीय बदलीनुसार जाणार होते. परंतु, शुक्रवारी सकाळच्या सुमारास सचिन यांना स्मिता घरी दिसून आल्या नाहीत. शोधाशोध घेऊनही न सापडल्याने अखेर सचिन यांनी पत्नी स्मिता या बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार कणकवली पोलिसांनी शोधमोहीम राबवत असताना रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय परिसरात काजूच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने एका महिलेने गळफास घेतलेला मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना दिसल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाहताच स्मिता माने यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. महिला हवालदार स्मिता माने यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळा पसरली आहे. स्मिता माने यांचा मृतदेह शवच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. स्मिता माने यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू- सासरे, दीर, वहिनी असा परिवार आहे.  या प्रकरणाचा तपास कणकवली पोलीस करीत आहेत.  या घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

error: Content is protected !!