
रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूर
यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संकल्प
कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील भंगसाळ नदी ते काळप नाका या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा एकूण ५० वडाची झाडे लावण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. या उपक्रमाची रोटरी सदस्य गजानन कांदळगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाच वडाची झाडे लावून सुरुवात करण्यात आली.
वडाची झाडे केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणार नाहीत, तर भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना थंडगार सावलीही देतील. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यापुढे रोटरी क्लबच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज लावलेली ही छोटी रोपे उद्या मोठे वृक्ष बनतील आणि पर्यावरण संवर्धनासोबतच कुडाळच्या सौंदर्यात भर घालतील. भविष्यात वडाच्या झाडांनी नटलेला हा महामार्ग कुडाळची एक वेगळी आणि पर्यावरणपूरक ओळख निर्माण करेल, असा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, रो. गजानन कांदळगावकर, रो. राजन बोभाटे, रो. राजीव पवार, रो. प्रणय तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, माजी नगरसेवक आबा धडाम, प्रथमेश केळवाईकर, शैलेश काळप, राजवीर पाटील, श्री. कांबळी तसेच संविता आश्रम पणदूरचे संस्थापक अध्यक्ष रो. संदीप परब व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.









