
विविध विभागांतून ५८० बालकांची तपासणी; गरजू पालकांनी केंद्राचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासातील अडचणी, जन्मजात दोष आणि विकासात्मक विलंब यांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार व पुनर्वसनात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळ येथील जिल्हा महिला व रुग्णालयात सुरू करण्यात आलेले जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) महत्त्वपूर्ण ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध विभागांतून एकूण ५८० बालकांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी बैठकीत कामकाजाबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्रात जन्मापासून बालकांमध्ये आढळणारे जन्मजात दोष, विविध आजार, पोषणविषयक कमतरता, विकासात्मक विलंब आणि अपंगत्व यांची तपासणी केली जाते. बालकांच्या आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करणे, हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे बालकांच्या विकासातील अडचणी कमी करण्यास तसेच आवश्यक पुनर्वसनात्मक सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होते.
या केंद्रातील उपलब्ध नोंदीनुसार, दंत विभागात ९९, फिजिओथेरपी विभागात ५१, स्पीच थेरपी विभागात ४५, कान तपासणी विभागात ३३, मानसोपचार विभागात १६, विशेष शिक्षकांच्या माध्यमातून ६६, डोळे तपासणी विभागात ६५ आणि ऑक्युपेशनल थेरपी अर्थात व्यवसायोपचार विभागात १३ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. या मध्ये २०५ बालके हे इतर आहेत त्यांना किंवा बालकाच्या पालकांना समुपदेशन करण्यात येते. या सर्व विभागांतील तपासणीची एकूण संख्या ५८० आहे.
बालकांच्या बोलण्यात, ऐकण्यात, हालचालींमध्ये किंवा मानसिक व शारीरिक विकासात विलंब जाणवत असल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, हालचालींशी संबंधित अडचणी, दृष्टी व श्रवणविषयक समस्या तसेच पोषणविषयक कमतरता यांसारख्या समस्यांचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देता येते. त्यासाठी पालकांनी बालकांच्या वाढीचे व विकासाचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विविध आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र पालकांसाठी उपयुक्त ठरत आहे. गरजू बालकांना योग्य वेळी तपासणी, उपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पुनर्वसनात्मक सेवा मिळाव्यात, यासाठी पालकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
यावेळी पालकमंत्री कार्यालयाचे ओएसडी मनोज भोगटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्जुन एन. नरोटे, डीईआयसी व्यवस्थापक विक्रम कांबळे, फिजिओथेरपिस्ट अँजेला रॉड्रिग्ज, समाजसेवक केतन कदम, विशेष शिक्षक संतोष देसाई, नेत्र चिकित्सक अधिकारी रोहन वारंग, स्टाफ नर्स लोचन चिंदरकर, दंत तंत्रज्ञ श्रीमती शलाका राणे, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (डी.एम.एच.पी. कार्यक्रम) रेश्मा भाईप आणि ऑडिओलॉजिस्ट (एनपीपीसीडी कार्यक्रम) प्रवीण पाटील उपस्थित होते.








