ठळक घडामोडी

कुडाळ महाविद्यालयाच्या पुढाकारातून सिंधुदुर्गातील जलसुरक्षा आणि सुरक्षित पर्यटनाला नवी दिशा!

भूगोल विभागाच्या समन्वयातून TISS–RNLI–RLSS पथकाची जिल्हा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक

कुडाळ : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांशी शैक्षणिक संस्थांना जोडत स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण उपक्रमांना चालना देण्याच्या आपल्या भूमिकेचा प्रत्यय संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांनी पुन्हा एकदा दिला आहे. महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या पुढाकारातून व समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसुरक्षा, बुडण्याच्या घटना रोखणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर समुदायाची लवचिकता वाढविणे या विषयावरील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मार्ग अधिक दृढ झाला आहे.
      कुडाळ मधील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागातील डॉ. अनुराधा गावडे आणि डॉ. रविंद्र गावडे यांनी या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयासाठी आवश्यक स्थानिक समन्वय आणि संस्थात्मक संपर्क साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय वास्तवाशी निगडित प्रश्नांचा अभ्यास करणारा भूगोल विभाग शैक्षणिक ज्ञान प्रत्यक्ष विकास प्रक्रियेशी जोडण्याच्या दिशेने सातत्याने कार्यरत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या नेतृत्वाखालीरॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्यूशन (RNLI), यूके आणि रॉयल लाइफ सेव्हिंग सोसायटी (RLSS) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
        सिंधुदुर्गातील या प्रकल्पासाठी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने स्थानिक पातळीवर आवश्यक संस्थात्मक समन्वय साधत जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि प्रकल्पातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावली आहे.
      या सहकार्याचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ६ ऑक्टोबर २०२६ रोजी TISS–RNLI–RLSS पथकाने कुडाळ येथे भेट दिली.या पथकाचे नेतृत्व TISSच्या डॉ. ब्रिनेल डीसूझा यांनी केले. त्यांच्यासोबत RNLI चे श्री. टॉम मॅकक्रॉ आणि RLSS चे कमोडोर अरविंद शर्मा उपस्थित होते.
      पथकाने प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२.३० ते १.४५ या वेळेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस RDC श्री. मच्छिंद्र सुकटे, DDMO श्रीमती राजश्री सामंत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.डॉ.ब्रिनेलडी’सूझा यांनी प्रकल्पाची उद्दिष्टे, सिंधुदुर्गातील प्रस्तावित कामकाज आणि जलसुरक्षा व बुडण्याच्या घटना कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या संभाव्य उपाययोजनांची माहिती दिली.
     सायंकाळी ५.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, यांनी या पथकाला विशेष वेळ देऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीस RDC श्री. मच्छिंद्र सुकटे आणि DDMO श्रीमती राजश्री सामंत उपस्थित होते. डॉ. ब्रिनेल डी’सूझा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
चर्चेतील विशेष महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाशी जलसुरक्षेची सांगड घालण्याची संकल्पना. केंद्र व राज्य शासनाच्या ‘One Nation, One Destination’ या पर्यटनविषयक दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची निवड महत्त्वाची मानली जात आहे. सिंधुदुर्गला पर्यटनाचे प्रमुख स्थान म्हणून विकसित करताना समुद्रकिनारे, जलक्रीडा आणि इतर जलआधारित पर्यटनस्थळे अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. जलसुरक्षेच्या माध्यमातून पर्यटन अधिक सुरक्षित आणि शाश्वत करण्याची ही संकल्पना जिल्हाधिकारी श्रीमती. तृप्ती धोडमिसे, RDC श्री.मच्छिंद्र सुकटे आणि DDMO श्रीमती. राजश्री सामंत यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मकतेने घेतली. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून शक्य तितके सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
        भेटीदरम्यान TISS–RNLI–RLSS पथकाने प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. डॉ. ब्रिनेल डी’सूझा, श्री. टॉम मॅकक्रॉ आणि कमोडोर अरविंद शर्मा यांनी प्रकल्पाचे स्वरूप, सिंधुदुर्गच्या संदर्भातील त्याचे महत्त्व तसेच TISS, RNLI आणि RLSS यांच्या भूमिका स्पष्ट केल्या. स्थानिक शैक्षणिक संस्था संशोधन, प्रशासन, आंतरराष्ट्रीय ज्ञान आणि स्थानिक समुदाय यांच्यात प्रभावी दुवा म्हणून कशा प्रकारे कार्य करू शकतात, यावरही या संवादातून भर देण्यात आला.
      सिंधुदुर्गच्या विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य निर्माण करणे, जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे संशोधनाच्या माध्यमातून पाहणे आणि उपलब्ध तज्ज्ञता स्थानिक विकासासाठी उपयोगात आणणे, हीसंत राऊळ महाराज महाविद्यालयाची सातत्यपूर्ण भूमिकाआहे. TISS–RNLI–RLSS या सहकार्याच्या माध्यमातून महाविद्यालयाने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि व्यापक शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्र यांच्यातील महत्त्वाचा संस्थात्मक दुवा म्हणून आपली भूमिका अधोरेखित केली आहे.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, संत राऊळ महाराज महाविद्यालय, TISS, RNLI आणि RLSS यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, सिंधुदुर्गला सुरक्षित, सक्षम, लवचिक आणि शाश्वत पर्यटन स्थान म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

error: Content is protected !!